Type Here to Get Search Results !

प्रभाग ३० मधील धोकादायक लोखंडी जाळ्यांची दुरुस्ती करा; शिवसेनेचे सागर देशमुख यांची बांधकाम विभागाकडे मागणी

 प्रभाग ३० मधील धोकादायक लोखंडी जाळ्यांची दुरुस्ती करा; शिवसेनेचे सागर देशमुख यांची बांधकाम विभागाकडे मागणी


नाशिक (प्रतिनिधी) :- नितिन चव्हाण 


पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभागातील विविध कॉलनींमध्ये ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांचे फाउंडेशन उखडल्याने या जाळ्या अत्यंत धोकादायक स्थितीत आल्या आहेत. विशेषतः वळणावर (टर्निंगवर) असलेल्या या जाळ्यांमुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येची गंभीर दखल घेत प्रभाग क्रमांक ३० मधील शिवसेना पदाधिकारी सागर देशमुख यांनी आज बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. तसेच या धोकादायक जाळ्या तातडीने दुरुस्त करण्याची किंवा त्याऐवजी सिमेंटचे ढापे टाकण्याची आग्रही मागणी केली.

सध्या कॉलनीमधील रस्त्यांवर असलेल्या या लोखंडी जाळ्या उखडून वर आल्या आहेत. यामुळे कॉलनीत खेळणाऱ्या लहान मुलांना गंभीर दुखापत होण्याची भीती स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय, रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार महिलांना येथून वाहन चालवणे अत्यंत जिकिरीचे व अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे.


भविष्यात घडू शकणारी एखादी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने या समस्येचा तातडीने पाठपुरावा करण्यात आला. या पाहणी दौऱ्याप्रसंगी बांधकाम विभागाचे अधिकारी बबन बेंडकुळे यांच्यासह परिसरातील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments