Type Here to Get Search Results !

गोविंदनगर–सिटी सेंटर मार्गावर 'ड्रेनेजगंगा'; बांधकाम व्यावसायिकाच्या कारभाराने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?

गोविंदनगर–सिटी सेंटर मार्गावर 'ड्रेनेजगंगा'; बांधकाम व्यावसायिकाच्या कारभाराने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ?


नाशिक : (प्रतिनिधी)

एकीकडे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका शहर स्वच्छतेचे दावे करत आहे. आयुक्त मनीषा खत्री स्वतः नालेसफाई आणि विविध कामांची पाहणी करत आहेत. मात्र दुसरीकडे सिडको विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पामुळे प्रशासनाच्या दाव्यांनाच तडा गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बांधकामस्थळी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी थेट पाईप रस्त्यावर सोडल्याने ड्रेनेजमधील दूषित पाणी मुख्य रस्त्यावर वाहू लागले आहे. परिणामी संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत. रस्त्यावरून वाहणाऱ्या या घाण पाण्यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच स्थानिक व्यावसायिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


विशेष म्हणजे हा रस्ता शहरातील महत्त्वाच्या वर्दळीच्या मार्गांपैकी एक असून, दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. अशा ठिकाणी दूषित पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याने डासांची उत्पत्ती, संसर्गजन्य आजार आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने आपली बाजू मांडताना सांगितले की, ही समस्या सोडविण्यासाठी सिडको विभागीय कार्यालयाकडे दोन वेळा लेखी अर्ज करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने पर्याय नसल्यामुळे ही व्यवस्था करावी लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.


मात्र हा दावा कितपत योग्य आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत ड्रेनेजचे दूषित पाणी थेट सार्वजनिक रस्त्यावर सोडणे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केली नसल्यास त्याची शिक्षा नागरिकांनी का भोगायची, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.


एकीकडे स्वच्छ शहराचे स्वप्न दाखविले जात असताना दुसरीकडे भररस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याचे चित्र मनपा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. आता मनपा प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करणार का, तसेच नागरिकांना या दुर्गंधी आणि आरोग्याच्या धोक्यातून दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments