Type Here to Get Search Results !

'कोटींच्या लोनचे स्वप्न दाखवून ४ कोटींचा डल्ला; 'लेडी मास्टरमाईंड' अंबड पोलिसांच्या जाळ्यात!'

'कोटींच्या लोनचे स्वप्न दाखवून ४ कोटींचा डल्ला; 'लेडी मास्टरमाईंड' अंबड पोलिसांच्या जाळ्यात!'

नाशिक (प्रतिनिधी):-

 व्यवसायासाठी मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत महिलांची तब्बल चार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य महिला आरोपीला अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सई राजेंद्र बोडके (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



अंबड पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आरोपी सई बोडके, तिचा पती राजेंद्र बोडके आणि विनोद दौड यांनी संगनमताने महिलांना "ओम साई बचतगट" व "अरिहंत मायको फायनान्स, चेन्नई" यांच्या माध्यमातून व्यवसायासाठी १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी महिलांचे बचतगट तयार करून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरूपात १८ लाख ५३ हजार रुपये आणि चार तोळे सोन्याचे दागिने, तसेच इतर महिलांची मिळून सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.


या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१२/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपी महिला अनेक दिवसांपासून राहण्याचे ठिकाण बदलत पोलिसांना चकवा देत होती. दरम्यान, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम आणि भगवान जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मखमलाबाद येथील गामणे मळा परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.


त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी अंबड पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल यांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयात हजर केले असता आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध तसेच आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार चारूदत्त निकम, भगवान जाधव आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments