दोन वर्षांपासून फरार 'कट्ट्या' जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-2 ची कारवाई
नाशिक (प्रतिनिधी) -:
चोरीच्या गुन्ह्यात तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-2 ने गंजमाळ परिसरातून अटक केली. कृष्णा उर्फ कट्ट्या युवराज पालवे (रा. भीमवाडी, सहकार भवन, गंजमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पुढील कारवाईसाठी त्याला इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा पालवे हा गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. त्याचा शोध गुन्हे शाखा युनिट-2 घेत असताना सहपोलीस निरीक्षक मनोहर शिंदे व नंदकुमार नांदुर्डीकर यांना गोपनीय माहिती मिळाली. आरोपी गंजमाळ पोलीस चौकीच्या मागील परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ सापळा रचला.
पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने संबंधित चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपीला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
या कारवाईमुळे दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा युनिट-2 ला यश आले असून, पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments