मतदार यादी पुनरीक्षणादरम्यान महिला बीएलओला मारहाण; मोबाईल फोडून शासकीय कामात अडथळा
इंदिरानगर | प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) मोहिमेदरम्यान नाशिकमधील वडाळागाव येथे शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल फोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१४ जुलै) दुपारी घडली. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूकसार शेख (वय ३८, रा. पखाल रोड) या १२४ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांतर्गत के.बी.एच. विद्यालय, वडाळागाव येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास त्या सहकारी अनम मनियार यांच्यासह विद्यालयात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचे काम करत होत्या.
यावेळी शाहिस्ता शेख आणि हिना शेख या दोन महिला तेथे आल्या. मतदार नोंदणीचे काम थांबविण्याच्या उद्देशाने त्यांनी रूकसार शेख यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. "तुम्ही आमच्याशी नीट बोलला नाहीत, तुमची मस्ती जिरवावी लागेल," अशी धमकी देत त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर दोघींनी रूकसार शेख यांच्याशी झटापट करत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वादादरम्यान रूकसार शेख यांचा मतदार यादीसंदर्भातील महत्त्वाचा डेटा असलेला मोबाईल फोन हिसकावून जमिनीवर आपटून फोडण्यात आला. घटनेनंतर दोन्ही महिला तेथून पसार झाल्या.
या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकी देणे व मालमत्तेचे नुकसान करणे आदी आरोपांखाली शाहिस्ता शेख व हिना शेख यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment
0 Comments