भररस्त्यात तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून; इंदिरानगर हादरले!
प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या? दत्त मंदिर परिसरात रक्तरंजित थरार
नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीजवळील दत्त मंदिर परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान वैष्णवी आवारे या तरुणीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी आवारे ही परिसरात पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. हल्लेखोराने तिच्यावर अचानक जीवघेणा हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याची माहिती आहे.
या हत्येमागे प्रेमप्रकरणातील वाद असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, भररस्त्यात झालेल्या या निर्घृण हत्येमुळे इंदिरानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
(टीप : प्रेमप्रकरणातून खून झाल्याची बाब ही प्राथमिक माहिती असून, पोलिसांच्या अधिकृत तपासानंतरच अंतिम कारण स्पष्ट होणार आहे.)

Post a Comment
0 Comments