पंचवटी एक्स्प्रेसला रेक शेअरिंगचा पुन्हा फटका; सलग दुसऱ्या आठवड्यात विलंब, प्रवाशांचा संताप
स्वतंत्र रेकची प्रवासी संघटनेची मागणी; महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर
नाशिकरोड (प्रतिनिधी)
पंचवटी एक्स्प्रेसला रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसत आहे. रेक शेअरिंगच्या व्यवस्थेमुळे या गाडीला सतत विलंब होत आहे. नाशिक ते मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासह सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. आता सलग दुस-या आठवड्यात पंचवटीला नाशिकला पोहचण्यास विलंब झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
कोविडनंतर पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी (रेक) हिंगोलीला जाणा-या जनशताब्दी एक्स्प्रेससोबत शेअर करण्यात येत आहे. म्हणजेच पंचवटी ही गाडी हिंगोलीला जनशताब्दी म्हणून पाठवली जात आहे. त्यामुळे जनशताब्दी मुंबईला येण्यास विलंब झाल्यास त्याचा परिणाम पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर होतो. जनशताब्दी आल्यानंतर पंचवटी म्हणून ही गाडी नाशिकला रवाना होते.
मागील आठवड्यात हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस उशिराने मुंबईत पोहोचल्याने पंचवटी एक्स्प्रेसलाही विलंब झाला होता. परिणामी पंचवटी रात्री सुमारे ११.३० वाजता नाशिकला पोहोचली होती. आता सलग दुसऱ्या आठवड्यात असे घडले. गुरूवारी पंचवटी एक्स्प्रेस नाशिकला तब्बल ५० मिनिटे उशिराने दाखल झाली.
या सातत्याने होणाऱ्या विलंबाचा मोठा फटका नोकरदार महिला व पुरुष प्रवाशांना बसत आहे. रात्री उशिरा घरी पोहोचल्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे. गाडी नाशिकला उशिरा आल्याने शहर बस तसेच इतर वाहतुकीची साधनेही उपलब्ध राहत नाहीत. विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे.
प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी यापूर्वीही रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
प्रवाशांची गैरसोय, मानसिक त्रास आणि महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून पंचवटी एक्स्प्रेसला स्वतंत्र रेक उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे, उपाध्यक्ष किरण बोरसे, सचिव संजय शिंदे, कार्याध्यक्ष कैलास बर्वे, नितीन जगताप, सुदाम शिंदे, रतन गाढवे आणि उज्ज्वला कोल्हे यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments