Type Here to Get Search Results !

अशोका मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; झाडावर आदळली बस, चालक गंभीर – प्रवासी जखमी

अशोका मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; झाडावर आदळली बस, चालक गंभीर –  प्रवासी जखमी


नाशिक (प्रतिनिधी) :-


 नाशिकच्या द्वारका परिसरात महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वळवण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या MH 14 BT 4426 क्रमांकाच्या बसचा अशोका मार्गावर भीषण अपघात झाला. दुपारी बस अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बसमधील ५ ते ६ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.



अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.


दरम्यान, ज्या झाडावर बस आदळली ते झाड रस्त्याच्या अगदी मध्यभागी असून अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या झाडाबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


या अपघातानंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित धोकादायक झाड तातडीने हटवून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments