Type Here to Get Search Results !

दगडाचा वार... मोबाईलवर डल्ला; सराईताचा खेळ गुन्हेशाखेने खल्लास केला!

वृद्धावर दगडाने जीवघेणा हल्ला करून मोबाईल लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; गुन्हेशाखा युनिट-२ची धडाकेबाज कारवाई


नाशिक (प्रतिनिधी) :-

 सातपूर परिसरात एका वृद्धावर दगडाने हल्ला करून त्याला जखमी करत मोबाईल लुटणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने अटक करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे २० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.



१७ जुलै रोजी दुपारी आयटीआय मागील वसतिगृहाजवळून जात असलेल्या एका वृद्धाला धनराज सुनील वाघ (वय २५, रा. बुद्धविहाराजवळ, सिद्धार्थनगर, राजवाडा, मखमलाबाद, नाशिक) याने अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर दगडाने कपाळावर वार करून जखमी केले आणि त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.



घटनेनंतर गुन्हेशाखा युनिट-२च्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीची ओळख पटवली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पाथर्डीगाव परिसरात असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला.


आरोपीस पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या कारवाईमुळे जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट-२चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, संजय सानप, बाळू शेळके, शंकर काळे, सुनील आहेर, वाल्मिक चव्हाण आणि प्रवीण वानखेडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.


Post a Comment

0 Comments