सातपूर–अंबड लिंक रोडवर नियोजनाचा बोजवारा; एकेरी वाहतुकीमुळे कोंडी, नागरिक त्रस्त
सिडको (प्रतिनिधी) :-
सातपूर–अंबड लिंक रोडवर सुरू असलेल्या कामांदरम्यान योग्य नियोजनाचा पूर्णपणे अभाव असल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एकेरी वाहतुकीमुळे दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो लहान-मोठी वाहने ये-जा करतात. परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांनाही हा रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत धरावा लागत आहे. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने रस्ता क्रॉस करणे धोकादायक बनले आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतेही ठोस नियोजन करण्यात आलेले नाही. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने पर्यायी मार्ग, वाहतूक पोलिसांची नियुक्ती, खड्डे बुजविणे आणि चिखलाची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments