Type Here to Get Search Results !

'खड्ड्यात अडकली स्कूल व्हॅन'; नाशिक महापालिकेच्या निष्काळजीपणाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!

सह्याद्रीनगरातील धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांना रस्त्यातच उतरवून दुसऱ्या व्हॅनमधून शाळेत पाठवावे लागले, नागरिकांचा संताप


पंचनामा न्युज सिडको (प्रतिनिधी):-ता २३ जुलै:


नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल केली आहे. सिडकोतील सह्याद्रीनगर परिसरात गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल व्हॅन पावसाच्या पाण्याखाली दडलेल्या मोठ्या खड्ड्यात अडकल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र या घटनेमुळे पालक आणि नागरिकांनी नाशिक महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.



गेल्या काही दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू असून अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. सह्याद्रीनगर परिसरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल व्हॅन पाण्यातून मार्ग काढत असताना चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्याने वाहन थेट त्यात अडकले.


व्हॅन खड्ड्यात अडक


ल्यानंतर काही काळ विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाने प्रसंगावधान राखत सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यानंतर दुसरी स्कूल व्हॅन बोलावून विद्यार्थ्यांना शाळेत रवाना करण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या कामकाजावर जोरदार टीका केली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याचे दावे केले जातात; मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरवर्षी त्याच समस्या, त्याच खड्ड्यांमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.


सिडको परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत असून वाहनांचे नुकसान, वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तातडीने खड्डे बुजवून पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नाशिक महानगरपालिकेची असेल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments