पत्रांची दखलच नाही!'; पेलीकन पार्कमधील महाकाय निलगिरी घरावर कोसळला, थोडक्यात अनर्थ टळला
वारंवार तक्रारी करूनही उद्यान विभागाची कानाडोळ्याची भूमिका; पावसाळ्यापूर्वी छाटणी न झाल्याने नागरिकांमध्ये संताप
पंचनामा न्यूज सिडको | (प्रतिनिधी)
सिडको परिसरातील पेलीकन पार्क (सेंट्रल पार्क) लगतच्या रहिवासी भागात गुरुवारी मुसळधार पावसादरम्यान एक महाकाय निलगिरीचा वृक्ष थेट घरावर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत घराच्या छतासह भिंतींचे नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, घरातील सदस्य वेळेत सुरक्षित बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पेलीकन पार्क परिसरातील अनेक निलगिरीचे वृक्ष धोकादायक अवस्थेत असून, याबाबत वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही उद्यान विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. पावसाळ्यापूर्वी धोकादायक वृक्षांची छाटणी किंवा हटविण्याची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे वृक्षाचे संतुलन बिघडले आणि तो थेट घरावर कोसळला. या घटनेत घराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील वीजपुरवठाही काही काळ विस्कळीत झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देत पडलेला वृक्ष हटविण्याचे काम सुरू केले.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, परिसरात अजूनही अनेक उंच आणि जीर्ण निलगिरीचे वृक्ष उभे आहेत. हे वृक्ष भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे केवळ पडलेला वृक्ष हटवून चालणार नाही, तर संपूर्ण परिसरातील धोकादायक वृक्षांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
"आज घराचे नुकसान झाले, पण उद्या एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?" असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही होत आहे.
दरम्यान, पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने महापालिकेने शहरातील सर्व उद्याने, रस्ते आणि रहिवासी भागांमधील धोकादायक वृक्षांची तातडीने तपासणी करून छाटणी व हटविण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment
0 Comments