शाळेच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधनी शाळा क्र. ७१ परिसराची दुरवस्था
सिडको प्रतिनिधी :-ता :, २७जुलै
सिडकोतील रायगड चौक परिसरातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधनी शाळा क्रमांक ७१ च्या परिसरात तसेच शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाजर गवत वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळेच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे पालक आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हा परिसर रहदारीचा तसेच दाट लोकवस्तीचा असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा असते. मात्र शाळेच्या आवारात व मैदानावर गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
शाळेतील विद्यार्थी याच मैदानावर खेळण्यासाठी आणि विविध उपक्रमांसाठी येत असतात. मात्र मैदानाची झालेली दुरवस्था आणि अस्वच्छ वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचरा हटविणे, गाजर गवत काढणे आणि डास प्रतिबंधक फवारणी करण्याची मागणी पालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments