Type Here to Get Search Results !

नाशिक जिल्ह्यात गुटखा माफियांवर एफडीएचा धडक प्रहार; ₹6.65 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन गुन्हे दाखल

हरसूल, मालेगाव आणि पेठ येथे एकाच दिवशी कारवाई; प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व वाहन जप्त


नाशिक :(प्रतिनिधी) ता :, ३१जुलै 


 अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूविरोधात नाशिक जिल्ह्यात मोठी धडक कारवाई करत तब्बल ₹6 लाख 65 हजार 241 रुपयांचा प्रतिबंधित साठा व वाहन जप्त केले. या कारवाईत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.



अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) संदीप देवरे यांच्या नेतृत्वाखाली ३० जुलै रोजी ही विशेष मोहीम राबविण्यात आली.


हरसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलमान बाबाखान शहा याच्याकडून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ₹1,08,666 किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0095/2026 दाखल करण्यात आला आहे.



दुसरी मोठी कारवाई मालेगाव येथील द्याने रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. येथे साजिद अख्तर मोहम्मद मुस्तफा अन्सारी याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि वाहतूक सुरू असल्याचे आढळले. या कारवाईत ₹2,01,800 किमतीचा प्रतिबंधित साठा तसेच ₹3 लाख किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. एकूण ₹5,01,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा क्रमांक 0115/2026 दाखल करण्यात आला आहे.


तिसरी कारवाई पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. योगेश नंदलाल सोनजे याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून ₹54,775 किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 0151/2026 दाखल करण्यात आला आहे.


तीन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अन्नपदार्थांबाबत दर्जा, भेसळ किंवा अस्वच्छतेची तक्रार complaints.mahafda.in या अधिकृत पोर्टलवर किंवा 1800 222 365 या टोल-फ्री क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरुद्ध पुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments