Type Here to Get Search Results !

योगा हॉलचा 'श्वास' कोंडला! पत्र्यांच्या आड कैद झाला प्रकाश; महिलांचा संताप उसळला

 महात्मा फुले गार्डनमधील योगा हॉलमध्ये हवा-उजेडाचा अभाव; काचेच्या खिडक्या हटवून पत्रे बसवल्याने आरोग्यदायी वातावरणाचा बोजवारा


सिडको (प्रतिनिधी) :-


सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मधील महात्मा फुले गार्डन येथे नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले योगा हॉलचा अक्षरशः श्वासच कोंडला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सकाळी आणि सायंकाळी शेकडो महिला या ठिकाणी योगाभ्यासासाठी येतात. मात्र योगासाठी आवश्यक असलेली मोकळी हवा आणि नैसर्गिक प्रकाश याऐवजी त्यांना अंधार, उकाडा आणि घुसमटलेल्या वातावरणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.



योगा हॉलच्या चारही बाजूंना पूर्वी काचेच्या खिडक्या बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे बाहेरचा नैसर्गिक प्रकाश हॉलमध्ये येत होता. तसेच खेळती हवा असल्याने योगाभ्यास करताना महिलांना कोणताही त्रास होत नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी या काचेच्या खिडक्या काढून त्यांच्या जागी पत्रे ठोकण्यात आली. परिणामी हॉलमध्ये दिवसाढवळ्याही अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून हॉलची हवा पूर्णपणे बंद झाली आहे.

(फोटो ओळी) -पत्र्याच्या खिडक्यांमुळे हॉलमध्ये अंधाराचे साम्राज्य 


विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून या पत्र्यांमुळे खिडक्या कायमस्वरूपी बंद ठेवाव्या लागतात. त्यामुळे हॉलमध्ये ना सूर्यप्रकाश पोहोचतो, ना ताजी हवा. योगाभ्यासासाठी शांत, हवेशीर आणि प्रसन्न वातावरण आवश्यक असते. मात्र येथे महिलांना घुसमटलेल्या वातावरणात योगा करावा लागत असल्याने आरोग्य सुधारण्याऐवजी त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.


पावसाळ्यात शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. अशावेळी योगा हॉलमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने संपूर्ण हॉल काळोखात बुडतो. अनेकदा मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात किंवा योगा थांबवून महिलांना बाहेर पडावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ महिला आणि नियमित योगाभ्यास करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


योगा हॉलमध्ये पूर्वी असलेल्या काचेच्या खिडक्या कोणत्या कारणामुळे काढण्यात आल्या, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसापासून संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी पत्रे बसविण्याऐवजी दर्जेदार काचेच्या सरकत्या किंवा अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या बसविल्या असत्या, तर प्रकाश, हवा आणि सुरक्षितता हे तिन्ही उद्देश साध्य झाले असते, असे मत महिलांनी व्यक्त केले.


महात्मा फुले गार्डनमधील हा योगा हॉल नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आला आहे. मात्र आज त्याच हॉलमध्ये हवा आणि प्रकाशाचा अभाव असल्याने नागरिकांच्या आरोग्याशीच तडजोड होत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन पत्रे हटवून पुन्हा काचेच्या खिडक्या बसवाव्यात, तसेच हॉलमध्ये नैसर्गिक प्रकाश व खेळती हवा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी योगाभ्यास करणाऱ्या महिलांनी केली आहे.


♦️महिलांच्या प्रमुख तक्रारी

काचेच्या खिडक्या काढून पत्रे बसविल्याने हॉलमध्ये अंधार.


♦️खेळती हवा बंद झाल्याने घुसमट आणि उकाडा.


♦️वीज गेल्यानंतर संपूर्ण हॉल काळोखात.


♦️योगाभ्यासात अडथळे; ज्येष्ठ महिलांना अधिक त्रास.


♦️तातडीने काचेच्या खिडक्या बसविण्याची मागणी.

Post a Comment

0 Comments