Type Here to Get Search Results !

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये जल्लोष; ११ फूट भव्य पुतळ्याचे लोकार्पण उत्साहात

 अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये जल्लोष; ११ फूट भव्य पुतळ्याचे लोकार्पण उत्साहात


नाशिक प्रतिनिधी :-ता १ ऑगस्ट 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त शनिवारी नाशिकमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या निमित्ताने एन. डी. पटेल रोडवरील अण्णाभाऊ साठे यांच्या ११ फूट उंच भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत जल्लोषात कार्यक्रम पार पाडला.



लोकार्पण सोहळ्यानंतर मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांमधून सामाजिक समता, न्याय आणि वंचित समाजाच्या सक्षमीकरणाचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले.


कार्यक्रमास विनायक पांडे, महापौर हिमगौरी आडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, मच्छिंद्र सानप, रंजन ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यानंतर कालिदास कला मंदिर येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. समाज, शिक्षण, कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा तसेच सामाजिक समतेचा संदेश अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.


संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या जयंती सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

Tags

Post a Comment

0 Comments