Type Here to Get Search Results !

गामने मळा प्रीमियर लीगवर कार्तिक इलेव्हनचे वर्चस्व; घुले बिल्डर्सवर १५ धावांनी मात करत चषकावर नाव कोरले

११२ धावांचे आव्हान ठरले अभेद्य; १० संघांचा सहभाग, मेहराज सैय्यद मालिकावीर, ४६ सामनावीर पुरस्कारांचे वितरण


सिडको (प्रतिनिधी) :-ता २ ऑगस्ट


मॉर्निंग स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने गामने मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'गामने मळा प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा-२०२६' चा रविवारी (दि.२) उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखदार समारोप झाला. महिनाभर रंगलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कार्तिक इलेव्हनने घुले बिल्डर्सवर १५ धावांनी मात करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्याने क्रिकेटप्रेमींना अखेरच्या चेंडूपर्यंत खिळवून ठेवले.



प्रथम फलंदाजी करताना कार्तिक इलेव्हनने अवघ्या ८ षटकांत ११२ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. विजयासाठी ११३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या घुले बिल्डर्सने झुंजार खेळ केला. मात्र कार्तिक इलेव्हनच्या अचूक गोलंदाजी आणि भेदक क्षेत्ररक्षणामुळे घुले बिल्डर्सचा डाव ९६ धावांत आटोपला आणि कार्तिक इलेव्हनने १५ धावांनी दणदणीत विजय मिळवत चषकावर नाव कोरले.

 (फोटो ओळी) विजयाचा जल्लोष करताना कार्तिक इलेव्हन संघ 


या स्पर्धेत नाशिक स्पोर्ट्स स्टुडिओ, कृष्णा बॉईज, सोनवणे वॉरियर्स, सोनवणे ब्लास्टर्स, इनोसंट वॉरियर्स, एस.बी. रायडर्स, कार्तिक इलेव्हन, श्रेया इलेव्हन, घुले बिल्डर्स आणि यू.के. बादशाह अशा एकूण १० संघांनी सहभाग घेतला. महिनाभर झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.


विजेत्या कार्तिक इलेव्हन संघाला चषकासह ११ हजार रुपये, तर उपविजेत्या घुले बिल्डर्स संघाला चषकासह ८ हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. अंतिम सामन्यातील दोन्ही संघांच्या खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले.


स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये मेहराज सैय्यद याने उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर हे दुहेरी मानाचे पुरस्कार पटकावले. वैभव एखंडे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून क्रिकेट शूज, तर शुभम ढेमसे यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वायरलेस स्पीकर प्रदान करण्यात आला. तसेच संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तब्बल ४६ सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


अंतिम दिवसाचे थेट प्रक्षेपण एनटीसी लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवर करण्यात आल्याने मैदानावर उपस्थित राहू न शकलेल्या क्रिकेटप्रेमींनाही घरबसल्या अंतिम सामन्याचा रोमांच अनुभवता आला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मॉर्निंग स्टार क्रिकेट क्लबचे संघमालक सुनील निकुंभ, यू.के. बादशाहचे संघमालक उन्मेश कुलकर्णी, तसेच रामदास सहजराव, नितीन राजगिरे, पियुष एखंडे, प्रदीप गायकवाड, योगेश महाले आणि किरण बिडलान यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ राजपूत (छत्रपती संभाजीनगर) यांनी केले.

दर्जेदार नियोजन, खेळाडूंचा उत्साह, क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रोमांचक लढतींमुळे यंदाची गामने मळा प्रीमियर लीग स्थानिक क्रीडारसिकांसाठी संस्मरणीय ठरली. या स्पर्धेमुळे अनेक होतकरू खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले.

Post a Comment

0 Comments