Type Here to Get Search Results !

महामार्गावरील खड्ड्याचा आणखी एक बळी! शहापूरजवळ TDRF जवानाचा दुर्दैवी मृत्यू;

महामार्गावरील खड्ड्याचा आणखी एक बळी! शहापूरजवळ TDRF जवानाचा दुर्दैवी मृत्यू; 


शहापूर (प्रतिनिधी) :-


 मुंबई-नाशिक महामार्गावरील जीवघेणे खड्डे पुन्हा एकदा एका कुटुंबाचा आधार हिरावून घेणारे ठरले आहेत. शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात ठाणे TDRF (ठाणे आपत्ती प्रतिसाद दल) मधील जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, विकास गोरे हे दुचाकीवरून मुंबई-नाशिक महामार्गाने प्रवास करत होते. शहापूरजवळील भारंगी नदीच्या पुलाजवळ रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक आदळल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि ते गंभीर अपघातग्रस्त झाले. अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.


मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वाहनचालकांकडून वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढते.


या दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या TDRF जवानालाच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे जीव गमवावा लागल्याने ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे.


दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments