Type Here to Get Search Results !

लाखो रुपयांची उद्याने गाजरगवताच्या विळख्यात!; सिडको-इंदिरानगरमध्ये चिखल, खड्डे आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण

 लाखो रुपयांची उद्याने गाजरगवताच्या विळख्यात!; सिडको-इंदिरानगरमध्ये चिखल, खड्डे आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण


सिडको (प्रतिनिधी):-ता :,४ ऑगस्ट


नाशिक शहरातील सिडकोसह इंदिरानगर परिसरातील अनेक सार्वजनिक उद्यानांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून महापालिकेच्या उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून विकसित करण्यात आलेली ही उद्याने आज चिखल, मोठमोठे खड्डे, गाजरगवत आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



सध्या सुरू असलेल्या पावसामुळे उद्यानांमध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना पायी चालणेही धोकादायक बनले आहे. सकाळी आणि सायंकाळी नियमितपणे फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच युवकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेकांनी उद्यानांकडे पाठ फिरवली आहे.


उद्यानांमध्ये गाजरगवत आणि इतर तण मोठ्या प्रमाणात वाढल्याने संपूर्ण परिसर झाडाझुडपांनी व्यापला आहे. लहान मुलांसाठी बसविण्यात आलेले झोपाळे, घसरगुंडी, सी-सॉ यांसारखी खेळणी वाढलेल्या गवतामध्ये झाकली गेली आहेत. अनेक ठिकाणी ग्रीन जिमची उपकरणेही गवताच्या विळख्यात अडकली असून त्यांचा वापर करणे अशक्य झाले आहे. देखभालीअभावी काही उपकरणांवर गंज चढू लागल्याने लाखो रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


उद्यानांमध्ये साचलेले पाणी आणि वाढलेले गवत यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियासारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानात नेण्यास अनेक पालक टाळाटाळ करत आहेत.


नागरिकांचे म्हणणे आहे की, उद्यानांची नियमित साफसफाई, गवत कापणे, खड्डे बुजविणे, साचलेल्या पाण्याचा निचरा करणे आणि डास प्रतिबंधक फवारणी करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र अनेक महिन्यांपासून या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे.


स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाला तातडीने या उद्यानांची पाहणी करून गाजरगवत हटविणे, खड्डे बुजविणे, पाण्याचा निचरा करणे, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे तसेच ग्रीन जिमची उपकरणे आणि बालकांच्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या दुर्लक्षाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.


शहर झपाट्याने विकसित होत असताना सार्वजनिक उद्यानांची अशी दुरवस्था ही महापालिका प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज उद्याने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments