प्रभाग २६ मधील अनेक भागांत तीन महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा; नगरसेविका हर्षदा गायकर यांचे आयुक्तांना निवेदन
नाशिक (प्रतिनिधी) :-ता :,५ ऑगस्ट
प्रभाग क्रमांक २६ मधील अनेक भागांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दररोज संघर्ष करावा लागत असून, महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचेही हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ च्या नगरसेविका हर्षदा गायकर यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच उपमहापौर विलास शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
प्रभागातील साळुंखे नगर, डीजीपी नगर, शिवशक्ती चौक, सरस्वती चौक, वेणू नगर, चाणक्य नगर, खुटवड नगर, रामायण रो-हाऊस, रमा सोसायटी आदी परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यल्प दाबाने पाणी येत असल्याने घरगुती वापरासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी, काही कुटुंबांना खासगी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून, त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
या समस्येबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने नगरसेविका हर्षदा गायकर यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत सविस्तर निवेदन दिले. या निवेदनात संबंधित भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती देत, पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीने पाहणी करून आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपमहापौर विलास शिंदे यांच्याकडेही हा प्रश्न मांडण्यात आला.
पाणीपुरवठा नियमित नसल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे घरगुती कामकाज विस्कळीत होत असून, महिलांना पाणी साठविण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनाही याचा फटका बसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, या समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पाणीपुरवठ्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक २६ मधील हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर महानगरपालिका प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment
0 Comments