राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याकडे राज्याचे लक्ष; शाखाध्यक्षांकडून थेट रिपोर्ट, खड्ड्यांच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता
नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल वर्षभरानंतर दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष नाशिककडे लागले आहे. गुरुवार (६ ऑगस्ट) आणि शुक्रवार (७ ऑगस्ट) असा हा दौरा असून, पक्ष संघटनेचा आढावा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी सकाळी ९ वाजता मुंबई नाका येथे राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून, त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर दिवसभर बैठका आणि संघटनात्मक आढावा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता होणाऱ्या शाखाध्यक्षांच्या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे. या बैठकीत प्रत्येक शाखाध्यक्षाकडून राज ठाकरे स्वतः थेट कामाचा अहवाल घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकतेबरोबरच धाकाचे वातावरण असून, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर कारवाई किंवा संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यानंतर सकाळी ११ वाजता नाशिक ग्रामीणमधील १५ तालुक्यांची संयुक्त बैठक, दुपारी १२.१५ वाजता पक्षाने नियुक्त केलेल्या बीएलओंची बैठक आणि दुपारी २.३० वाजता शहर कार्यकारिणी तसेच सर्व अंगीकृत संघटनांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती, बूथनिहाय तयारी आणि संघटन विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवार (७ ऑगस्ट) रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृहावर तरुणांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून, मोठ्या संख्येने युवक मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे
खड्ड्यांच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर टीकेची शक्यता
नाशिक शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाढते खड्डे आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली नाराजी या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या दौऱ्यात या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेने यापूर्वीही खड्ड्यांच्या मुद्द्यावर आंदोलन करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यामुळे या दौऱ्यातही हा विषय प्रमुख ठरण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज ठाकरे मनसेच्या सत्ताकाळात नाशिकमध्ये झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत सध्याच्या परिस्थितीशी तुलना करू शकतात. गोदाघाटाचे सुशोभीकरण, बॉटनिकल गार्डन, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण तसेच शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांचा संदर्भ देत गेल्या सात-आठ वर्षांतील विकासाच्या गतीवर ते भाष्य करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज ठाकरे यांच्या या दौऱ्यातून मनसेची आगामी राजकीय दिशा, संघटनात्मक बदल आणि नाशिकमधील राजकारणाबाबत कोणते संदेश दिले जातात, याकडे आता राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments