ओझर पोलिसांची धडक कारवाई; आरोपी अटकेत, १३ महागडे मोबाईल जप्त
ओझर (प्रतिनिधी) :-
ऑनलाइन खरेदी-विक्री क्षेत्रातील नामांकित फ्लिपकार्ट कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच कंपनीच्या वितरण प्रक्रियेतील त्रुटीचा गैरफायदा घेत महागडे मोबाईल लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोगस पत्त्यांवर मोबाईलची ऑर्डर देऊन पार्सल स्वतःच्या ताब्यात घेणे आणि त्यानंतर ऑर्डर रद्द करून कंपनीची फसवणूक करण्याचा हा प्रकार ओझर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अभिषेक लोकेश सिन्हा (रा. ओझर, ता. निफाड) याला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १८ लाख ५० हजार रुपये किमतीचे १३ महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
ओझर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान आरोपी फ्लिपकार्टमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. कंपनीतील कामाचा अनुभव आणि वितरण प्रक्रियेची संपूर्ण माहिती असल्याने त्याने याचाच गैरफायदा घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बोगस नावाने व बनावट पत्त्यावर महागडे मोबाईल फोन ऑर्डर करत होता. पार्सल संबंधित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच ते स्वतःच्या ताब्यात घेत असे. त्यानंतर ऑर्डर रद्द करून मोबाईल स्वतःकडे ठेवत त्यांची विक्री केली जात होती. या पद्धतीने त्याने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले.
तपास अधिक सखोल करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत मोबाईल फोनचा मागोवा सुरू केला. त्यानंतर नागपूर, नाशिक, ओझर आणि पुणे येथे संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत आयफोन १७ प्रो मॅक्स, आयफोन १६ प्रो, गुगल पिक्सेल XL9 आणि सॅमसंग गॅलेक्सी २६ अल्ट्रा अशा विविध कंपन्यांचे एकूण १३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत १८ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्यामागे आणखी कोणाचे रॅकेट कार्यरत आहे का, आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे कंपनीची फसवणूक केली आहे का, तसेच चोरीचे मोबाईल इतर राज्यांत विकण्यात आले होते का, या सर्व बाबींचा पोलीस कसून तपास करत आहेत. या कारवाईमुळे ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या वितरण व्यवस्थेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी अधिक कडक यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.
ओझर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे लाखो रुपयांचे मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ओझर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

Post a Comment
0 Comments