Type Here to Get Search Results !

निफाडच्या राजकारणात मोठी घडामोड; विविध पक्षांतील दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश

 निफाडच्या राजकारणात मोठी घडामोड; विविध पक्षांतील दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश


गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न; नगरपंचायत निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली


पंचनामा न्यूज (प्रतिनिधी) ओझर :- तुषार झोडगे 


येत्या काही महिन्यांत होणाऱ्या निफाड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून, विविध पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. जलसंपदा, आपत्कालीन व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भारतीय जनता पक्षाचे नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष यतिनभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.



भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निफाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गणेश कापसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान शहराध्यक्ष संजय कुंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विद्यमान नगरसेवक जावेदभाई शेख तसेच दीपक कुंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


नगरपंचायत निवडणुकीपूर्वी झालेल्या या प्रवेशामुळे निफाडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


प्रवेश सोहळ्याला ज्येष्ठ भाजप नेते भागवत बाबा बोरस्ते, येवला विधानसभा प्रमुख आर्किटेक्ट अमृता पवार, निफाड विधानसभा प्रमुख वैकुंठ पाटील, भाजपचे माजी नाशिक जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, पिंपळगाव बसवंतचे नगराध्यक्ष मनोज बर्डे, नाशिक महापालिकेचे स्थायी समिती सदस्य मच्छिंद्र सानप, रमेश घुगे, शरद नाठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


या प्रवेशामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीत भाजप अधिक जोमाने मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत असून, निफाडच्या राजकारणाला नव्या दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments