सिडको विभागीय कार्यालयाच्या दारातच भटक्या कुत्र्यांची :,दहशत नागरिकांमध्ये भीती
सिडको (प्रतिनिधी):-
नाशिक शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून डॉग बाईटच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकजण कुत्र्यांच्या हल्ल्याला बळी पडत आहेत. काही दिवसांपूर्वी कामटवाडे परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही महापालिका प्रशासन मात्र अद्यापही जागे झालेले दिसत नाही.
शहरासह सिडको परिसरात भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. रस्ते, चौक, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांसह आता महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातही भटके कुत्रे मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या कार्यालयात दररोज विविध शासकीय कामांसाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि लहान मुलांसह शेकडो नागरिकांची ये-जा असते. अशा ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डॉग बाईटच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालक आपल्या लहान मुलांना एकटे बाहेर पाठविण्यास धजावत नाहीत. रात्रीच्या वेळी तर अनेक भागांत कुत्र्यांचे कळप रस्त्यावर धुमाकूळ घालत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि पुनर्वसनासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. उलट महापालिकेच्या स्वतःच्या विभागीय कार्यालयातच भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार दिसून येत असल्याने या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कामटवाडे येथील मृत्यूची घटना, वाढत्या डॉग बाईटच्या तक्रारी आणि आता विभागीय कार्यालयातील भटक्या कुत्र्यांचा वावर लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम हाती घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आणखी एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Post a Comment
0 Comments