भेसळखोरांवर एफडीएचा दणका!; नाशिक जिल्ह्यात लाखोंचा संशयित अन्नसाठा जप्त
मालेगाव, आडगाव, जुने नाशिकमध्ये धडक कारवाई; बेकरीला 'स्टॉप बिझनेस' नोटीस, दुकान सील, परवाना निलंबित
नाशिक : (प्रतिनिधी) ता :, २३जुलै
अन्न भेसळ करणारे आणि नियमांचे उल्लंघन करून अन्न व्यवसाय चालविणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने नाशिक जिल्ह्यात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. मालेगाव, आडगाव आणि जुने नाशिक येथे राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला. काही आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर एका दुकानाविरोधात गुन्हा दाखल करून ते सील करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. मालेगाव येथील श्रीराम एंटरप्रायझेस येथे छापा टाकून सुमारे १७ लाख २७ हजार रुपयांचे संशयित रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. तपासणीदरम्यान संबंधित व्यावसायिकाकडे आवश्यक कागदपत्रे, विक्री बिले तसेच परवान्यासंदर्भातील गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
याच मोहिमेदरम्यान मालेगावमधील ए-वन ताज बेकरीमध्ये परवान्याविना आणि अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांचे उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले. प्रशासनाने तेथून ४०० किलो टोस्ट जप्त करत संबंधित आस्थापनाला 'स्टॉप बिझनेस नोटीस' बजावली. नियमांचे पालन होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आडगाव येथील स्वागतम स्वीट्समध्ये तपासणीदरम्यान ९ किलो संशयित भेसळयुक्त गायीचे तूप जप्त करण्यात आले. तुपाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, जुने नाशिकमधील भारत जनरल स्टोअरमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाने एक लाख एक हजार रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करून दुकान सील केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
याशिवाय उपनगर परिसरातील सँडी बेकर्सचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी जिल्हाभर अशा तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, अन्न व्यवसायिकांनी कायद्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment
0 Comments