सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीला वेग; पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाचे पाऊल
पंचनामा न्यूज नाशिक (प्रतिनिधी) :-
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसची भेट मिळाली असून, केंद्र शासनाच्या PM-eBus सेवा योजनेअंतर्गत नाशिक सिटी लिंक आणि JBM Ecolife Mobility प्रा. लि. यांच्यात १० वर्षांच्या कालावधीसाठी करार करण्यात आला.
नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या उपक्रमामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविक आणि पर्यटकांच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे.
करारानुसार JBM Ecolife Mobility कंपनीकडून ५० अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती, तांत्रिक सेवा आणि इतर आवश्यक सुविधा कंपनीकडूनच पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे बससेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
PM-eBus सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे नाशिक महानगरपालिकेवरील आर्थिक भारही कमी होणार आहे. पारंपरिक डिझेल बसांच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसमुळे इंधनावरील खर्चात बचत होणार असून, कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होईल. परिणामी शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यास मदत होऊन हरित आणि शाश्वत नाशिकच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करून करण्यात आलेला हा करार दूरदृष्टीचा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महापौर हिमगौरी आहेर -अडके उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, भाजप गटनेते श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा रंजन ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते केशव पोरजे, सिटी लिंकचे महाव्यवस्थापक विजयकुमार मुंडे, व्यवस्थापक राहुल तोरो तसेच JBM कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप उंबरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments