नगरसेवक प्रविण तिदमेंच्या पाठपुराव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द; सिडको फ्री होल्डला मिळणार गती!
सिडको (प्रतिनिधी) :-
सिडकोतील घरधारक आणि भूखंडधारकांच्या फ्री होल्ड प्रक्रियेला गती देऊन सुमारे २५ हजार कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
सिडकोची घरे व भूखंड लीज होल्ड असल्याने नागरिकांना बांधकाम परवानगी, मालमत्ता हस्तांतरण तसेच बँकेकडून कर्ज घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. ९९ वर्षांच्या करारामुळे मालमत्तेवर पूर्ण मालकी हक्क मिळत नसल्याने फ्री होल्डची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या फ्री होल्डला परवानगी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होण्यासाठी तिदमे यांनी पुन्हा पाठपुरावा केला. नगर भूमापन विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
फ्री होल्ड प्रक्रिया पूर्ण झाल्यास सिडकोवासीयांना त्यांच्या मालमत्तेवर अधिक सुरक्षित व स्पष्ट मालकी हक्क मिळणार असून, विविध प्रशासकीय अडचणीही दूर होण्याची अपेक्षा आहे.


Post a Comment
0 Comments