Type Here to Get Search Results !

नाशिकमध्ये तुपाचा २.७५ लाखांचा साठा जप्त; १९६ लिटर दूध नष्ट

 नाशिकमध्ये तुपाचा २.७५ लाखांचा साठा जप्त; १९६ लिटर दूध नष्ट


नाशिक (प्रतिनिधी) :-ता :, ११ऑगस्ट 


अन्न व औषध प्रशासनाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विशेष तपासणी मोहिमेत नाशिक शहरासह ग्रामीण भागात कारवाई करण्यात आली. नाशिक शहरातील रविवार पेठ परिसरात विना परवाना अन्न व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्याने विविध ब्रँडच्या तुपाचा तब्बल ३९७.६०० किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत २ लाख ७५ हजार ८१२ रुपये आहे. दरम्यान, नांदगाव तालुक्यात अस्वच्छ वातावरणात साठविलेले १९६ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर दूध व दुग्धजन्य पदार्थांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १० ऑगस्ट रोजी नाशिक शहरातील रविवार पेठ येथील श्री. संजय भागचंद बुरड यांच्या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न परवाना नसताना विविध ब्रँडचे तूप विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.


तपासणीदरम्यान (KMP Krishna Cow Ghee, )(Madhuli Cow Ghee) आणि (Shreemayee Cow Ghee) या ब्रँडच्या तुपाचा एकूण ३९७.६०० किलो साठा जप्त करण्यात आला. हा अन्नपदार्थ कमी दर्जाचा असल्याचा संशय असल्याने त्याचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. विना परवाना अन्न विक्री व्यवसाय केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनेला व्यवसाय तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.


अस्वच्छ ठिकाणी दूध साठवणूक


ग्रामीण भागातील कारवाईत ७ ऑगस्ट रोजी नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथील चंद्रकांत गरुड दूध विक्रेत्याच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. संबंधित व्यवसाय विना नोंदणी सुरू असल्याचे तसेच अस्वच्छ वातावरणात दूध साठविल्याचे आढळले. दूध निर्धारित मानकापेक्षा कमी दर्जाचे असल्याचा प्रथमदर्शनी संशय आल्याने गाईच्या दुधाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. उर्वरित १९६ लिटर दूध नष्ट करण्यात आले.


या कारवाया अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता, सुरक्षित साठवणूक, हाताळणी व विक्रीबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच नागरिकांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत अथवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments