पत्र्यांनी अडवला प्रकाश, ‘पंचनामा’ने उघडल्या खिडक्या!
सिडको (प्रतिनिधी) :-ता :,११ ऑगस्ट
आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी महिलांना योगाभ्यासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने प्रभाग क्रमांक २४ मधील महात्मा फुले उद्यानात योगा हॉल उभारण्यात आला. मात्र, याच योगा हॉलच्या काचेच्या खिडक्या काढून त्याठिकाणी लोखंडी पत्र्याच्या खिडक्या बसविण्यात आल्याने महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. हॉलमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण होण्याबरोबरच खेळती हवाही बंद झाल्याने योगाभ्यासासाठी येणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
महिलांच्या या समस्येला ‘पंचनामा न्यूज’ने चार दिवसांपूर्वी वाचा फोडत पत्र्याच्या खिडक्यांमुळे योगा हॉलमध्ये निर्माण झालेल्या गैरसोयीचा मुद्दा प्रशासनासमोर आणला होता. या वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने अखेर हालचाली सुरू केल्या असून, पत्र्याच्या खिडक्या हटवून पुन्हा काचेच्या खिडक्या बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
(फोटो ओळी :- १ ऑगस्ट रोजी पंचनामा न्यूज ने प्रसिद्ध केलेली बातमी)
आरोग्यासाठी योगा, पण हॉलमध्येच अंधार!
महात्मा फुले उद्यानातील योगा हॉलमध्ये परिसरातील अनेक महिला नियमितपणे योगाभ्यासासाठी येतात. मात्र, काचेच्या खिडक्या काढून पत्र्याच्या खिडक्या लावण्यात आल्याने हॉलमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्यास अडथळा निर्माण झाला होता. परिणामी दिवसा देखील हॉलमध्ये अंधाराचे वातावरण जाणवत होते. त्यातच खिडक्या बंदिस्त झाल्याने हॉलमधील हवा खेळती राहत नव्हती.
आरोग्यासाठी योगा करण्यासाठी येणाऱ्या महिलांनाच बंदिस्त आणि हवेशीर नसलेल्या वातावरणाचा सामना करावा लागत असल्याने महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
बातमीचा परिणाम; प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही
या संपूर्ण प्रकाराबाबत ‘पंचनामा न्यूज’ने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रशासनाने दखल घेत पत्र्याच्या खिडक्या काढून पुन्हा काचेच्या खिडक्या बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे योगा हॉलमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा पुन्हा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे योगासाठी येणाऱ्या महिलांनी समाधान व्यक्त केले असून, नागरिकांच्या समस्या मांडणाऱ्या माध्यमांच्या पाठपुराव्याला प्रशासनाने प्रतिसाद दिल्याचे चित्र महात्मा फुले उद्यानात पाहायला मिळत आहे.
‘पंचनामा’च्या पाठपुराव्याला यश!
महिलांच्या गैरसोयीचा प्रश्न बातमीच्या माध्यमातून समोर आल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे महात्मा फुले उद्यानातील योगा हॉलच्या खिडक्यांचा प्रश्न मार्गी लागला असून, ‘बातमीचा दणका... प्रशासनाचा निर्णय!’ अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

Post a Comment
0 Comments