Type Here to Get Search Results !

जल-जंगल-जमिनीच्या हक्कांचा जागर; दत्तनगरात आदिवासी दिन उत्साहात

 जल-जंगल-जमिनीच्या हक्कांचा जागर; दत्तनगरात आदिवासी दिन उत्साहात


नाशिक (प्रतिनिधी) :-ता:, १० ऑगस्ट 


 जल, जंगल, जमीन, संस्कृती, परंपरा आणि संवैधानिक हक्कांच्या संरक्षणाचा संदेश देत दत्तनगर-अंबड परिसरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती, दत्तनगर-अंबड यांच्या वतीने माऊली चौक, कारगिल चौक आणि दत्तनगर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती राजेंद्र कवर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. अंबड एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे, भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे, नवीन नाशिक मंडल अध्यक्ष डॉ. वैभव महाले, माजी नगरसेवक राकेशदोंदे, नगरसेवक नितीन दातीर , नगरसेविका प्रियांका दोंदे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.


यावेळी पारंपरिक आदिवासी वाद्यांचे वादन आणि पारंपरिक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि वाद्यांनी परिसरात सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महिला व युवकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.


आदिवासी समाजाची संस्कृती, भाषा, परंपरा आणि अस्मिता जपतानाच संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत समाजात जनजागृती करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षण, सामाजिक एकता आणि संघटितपणे विकासासाठी प्रयत्न करण्याचा संदेशही देण्यात आला.


कार्यक्रमाला शेकडो आदिवासी महिला व बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments