नाशिक प्रतिनिधी-
फरार आणि पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हेशाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने तब्बल नऊ वर्षांपासून जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला श्रमिकनगर परिसरातून ताब्यात घेतले. संभाजी उर्फ संभ्या विलास कवळे (३१, रा. जय गणेश कॉलनी, सिद्धी विनायक मेडिकलजवळ, श्रमिकनगर, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरातील फरार तसेच पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गुन्हेशाखा युनिट क्रमांक दोनचे पथक फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना कवळे याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रमिकनगर परिसरात सापळा रचून आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यानंतर योग्य संधी साधून पोलिसांनी संभाजी उर्फ संभ्या कवळे याला ताब्यात घेतले.
कवळे याच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, तो मागील नऊ वर्षांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान त्याच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) कलम २९९ अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते.
गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या सतर्कतेच्या आधारे अखेर आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिक शहर पोलिसांनी १८ जून २०२६ पासून फरार आणि पाहिजे आरोपींविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत तब्बल १३ फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना संबंधित पोलिस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फरार आरोपींचा शोध घेऊन प्रलंबित गुन्ह्यांचा तपास मार्गी लावण्यासाठी पोलिसांकडून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींवरही कारवाई होत असल्याने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम महत्त्वाची ठरत आहे.

Post a Comment
0 Comments