आरोग्य केंद्रच आजारी! भारत नगर-शिवाजी वाडीतील आरोग्य केंद्राची दुरवस्था; पाणीही बंद, रुग्णांचा संताप
इंदिरानगर (प्रतिनिधी):-
सिडकोतील भारत नगर-शिवाजी वाडी परिसरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून येथे येणाऱ्या रुग्णांसह कर्मचाऱ्यांनाही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरोग्य सेवा देणारे केंद्रच अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आरोग्य केंद्राच्या इमारतीचे स्लॅब अनेक ठिकाणी गळत असून भिंतींचे प्लास्टर निघाले आहे. त्यामुळे संपूर्ण भिंतींवर शेवाळ साचले असून इमारतीची अवस्था धोकादायक बनली आहे. केंद्राबाहेरही कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून स्वच्छतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो.
याहून गंभीर बाब म्हणजे गेल्या १५ ते २० दिवसांपासून या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी तसेच दैनंदिन वापरासाठी आवश्यक पाण्याचा पुरवठाच होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कर्मचारी आणि रुग्ण दोघांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या आरोग्य केंद्रात दररोज सुमारे २५ ते ३० रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र केंद्राची जीर्ण अवस्था, अस्वच्छ परिसर आणि पाण्याचा तुटवडा यामुळे रुग्णांच्या आरोग्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच परिसराची स्वच्छता राखावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि रुग्णांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments