विद्युत तारांमुळे अनेक अपघात; मुलांचे बळी गेल्यानंतरही प्रशासनाची उदासीनता, नागरिकांचा संताप
सिडको (प्रतिनिधी) -:
सिडको परिसरात घरांवरून जाणाऱ्या विद्युत तारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परिसरातील विविध भागांमध्ये घरांच्या अगदी जवळून आणि छतांवरून जाणाऱ्या उच्चदाब व विद्युत तारांमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी या तारांच्या संपर्कात आल्याने अनेक निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तरीही हा प्रश्न कायम असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
"आणखी किती जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?" असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यात या तारांचा धोका अधिक वाढत असल्याने लहान मुले, नागरिक आणि घरांवर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सिडको परिसरातील सर्व विद्युत तारा तातडीने भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण आणि संबंधित प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ न करता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आता आली असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.


Post a Comment
0 Comments