रहदारीच्या मार्गांवरील झुकलेल्या फांद्या अपघाताला आमंत्रण; तातडीने छाटणीची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी | नाशिक (१२जुलै)
शहरातील सिडको तसेच इंदिरानगर परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी वृक्षांच्या मोठमोठ्या फांद्या रस्त्यावर झुकल्या असून काही वृक्ष मुळासकट कलंडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे हे वृक्ष किंवा त्यांच्या फांद्या कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिडको, इंदिरानगर आणि परिसरातील अनेक मुख्य रस्ते, अंतर्गत मार्ग तसेच वर्दळीच्या चौकांमध्ये झुकलेल्या फांद्या वाहनांच्या मार्गात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांनाही स्पर्श करत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाच्या काळात वाहनचालकांना या झुकलेल्या फांद्यांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शहरात यापूर्वीही वादळी वाऱ्यामुळे वृक्ष कोसळून वाहनांचे नुकसान झाल्याच्या तसेच नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तातडीने सिडको व इंदिरानगर परिसरातील धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण करून झुकलेल्या फांद्यांची छाटणी करावी, तसेच अतिधोकादायक वृक्ष त्वरित हटवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळा सुरू असताना नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, अपघात घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने आधीच खबरदारी घेतल्यास संभाव्य जीवित व वित्तहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे महापालिकेने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
-------------------------------
इंदिरानगर परिसरात रहदारीच्या मार्गावर झाडाच्या फांद्या वाढून रस्त्यावर झोकल्या गेले आहेत मोठ्या प्रमाणात पाऊस किंवा वारा आला तर या फांद्याकडून वाहनांचे नुकसान होऊ शकते अथवा एखाद्याच्या अंगावर पडू शकते त्यामुळे जीवित हानी होऊ शकते महापालिकेने तात्काळ या झाडाच्या फांद्या छटाव्या
प्रकाश काळे
स्थानिक रहिवासी

Post a Comment
0 Comments