Type Here to Get Search Results !

सिडको परिसरात मृत्यूचा सापळा! उघड्या डीपींमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ

  अश्विन नगरसह सिडकोतील विविध ठिकाणी  वीज वितरण बॉक्स उघडे; पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनेची भीती, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप


नाशिक | प्रतिनिधी (१२जुलै)


नाशिकच्या सिडको परिसरातील अश्विन नगर परिसरासह  विविध भागांमध्ये उघड्या अवस्थेत असलेल्या वीज वितरण डीपी (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) नागरिकांच्या जीवितासाठी अक्षरशः 'मृत्यूचा सापळा' ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अंतर्गत कॉलनी, रहिवासी भाग तसेच मुख्य रस्त्यांवर अनेक डीपींची झाकणे तुटलेली किंवा गायब असून, त्यामधील विद्युत यंत्रणा उघडी पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पावसाळ्याच्या दिवसांत या उघड्या डीपी अधिक धोकादायक ठरत आहेत. पावसाचे पाणी साचल्यास किंवा ओलावा वाढल्यास विजेचा धक्का लागून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मार्गांवरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि हजारो वाहनचालकांची ये-जा होत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवसांपासून या उघड्या डीपींकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही आवश्यक दुरुस्ती किंवा सुरक्षित झाकणे बसविण्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


राज्यात यापूर्वी उघड्या विद्युत यंत्रणेमुळे विजेचा धक्का लागून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यातूनही धडा न घेता संबंधित विभागाकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवालही परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.


सिडको परिसरातील सर्व उघड्या डीपींची तातडीने पाहणी करून सुरक्षित झाकणे बसविणे, खराब डीपींची दुरुस्ती करणे आणि नियमित तपासणीची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन आणि वीज वितरण विभागाची राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments