ड्रेनेजच्या दुर्गंधीने पवननगरकर हैराण! महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांचा संताप"
सिडको (प्रतिनिधी):-
सिडको परिसरातील पवननगर भागात ड्रेनेजच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असून परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे दूषित पाणी रस्त्यावर साचत असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे घरात राहणेही कठीण झाले असून परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी ही समस्या अनेक वेळा महापालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, वारंवार तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीन कारभाराबद्दल संतापाची भावना व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने तातडीने ड्रेनेजची दुरुस्ती करून परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment
0 Comments