Type Here to Get Search Results !

तीन दशकांचा कंत्राटी वनवास संपणार? २१२ कामगारांच्या प्रश्नावर नगरसेवक प्रविण तिदमे सरसावले

तीन दशकांचा कंत्राटी वनवास संपणार? २१२ कामगारांच्या प्रश्नावर नगरसेवक प्रविण तिदमे सरसावले


 नाशिक प्रतिनिधी :-ता :,१३ ऑगस्ट 


नाशिक महापालिकेच्या मलेरिया (पेस्ट कंट्रोल) विभागात वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या २१२ कामगारांच्या पदनिर्मितीला शासनाने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, हे २१२ कामगार सन १९९४ पासून मलेरिया विभागात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहेत. त्यांच्या नियमित पदनिर्मितीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक ११८८२/२०१८ व इतर याचिकांमध्ये १२ फेब्रुवारी २०२५ रोजी आदेश दिला आहे. या आदेशाच्या अनुषंगाने महापालिकेने २१२ कामगारांची यादी नगरविकास विभागाकडे पाठविली आहे.


पदनिर्मितीला शासनाची मान्यता मिळाल्यास संबंधित कामगारांच्या महापालिका सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तब्बल तीन दशकांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा देणाऱ्या या कामगारांवर होत असलेला अन्याय दूर करून न्याय द्यावा, अशी मागणी तिदमे यांनी केली.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे तिदमे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments