खड्ड्यांचा सातवा बळी; २४ दिवसांच्या झुंजीनंतर दिलीप काळे यांची प्राणज्योत मालवली!
नाशिक प्रतिनिधी:-
त्र्यंबक रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सातपूर येथील भाजी विक्रेते दिलीप काळे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल २४ दिवस मृत्यूशी झुंज देत कोमात असलेल्या काळे यांची प्राणज्योत अखेर मालवली. त्यांच्या मृत्यूमुळे नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सातवर पोहोचल्याचा दावा करण्यात येत आहे.
दिलीप काळे हे भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्र्यंबक रस्त्यावरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या २४ दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
काळे यांच्या मृत्यूनंतर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी जितेंद्रसिंग गिरासे, प्रभाकर निकम, उज्ज्वला गायकवाड, दीपाली बेळे, नीलेश कोतकर आणि मासूम शाह यांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाले आहेत . आता दिलीप काळे यांचा देखील खड्डे अपघातात मृत्यू झाला आहे
रस्त्यांची वेळेत दुरुस्ती न करणे, धोकादायक खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणे आणि कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण नसणे, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काळे यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व भरपाई द्यावी, तसेच रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून आणखी निष्पाप जीव जाण्यापासून प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment
0 Comments