नाशिक रोडच्या गोसावीवाडी चौफुलीवर गोळीबार; युवकाच्या पोटात दोन गोळ्या, प्रकृती गंभीर
नाशिक रोड :- प्रतिनिधी ता :, १६ ऑगस्ट
गोसावीवाडी चौफुली परिसरात रविवारी सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. पानटपरीसमोर उभ्या असलेल्या ३२ वर्षीय सुमित अरुण पगारे याच्यावर अज्ञात इसमाने दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गोळ्या पोटात लागल्याने सुमित रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
गोळीबाराची घटना घडताच परिसरातील नागरिकांनी जखमी सुमितला तातडीने नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गोळीबार करणारा संशयित घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सुमित पगारे हा काही दिवसांपूर्वीच नाशिक रोड कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अमली पदार्थ विक्रीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यामुळे हा गोळीबार जुन्या वादातून झाला आहे का, यासह हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोराचा माग काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

Post a Comment
0 Comments