Type Here to Get Search Results !

राष्ट्रभक्ती वाहतूक बेटावर ‘मिग-२१’ची दमदार एंट्री!

लेखानगरात दोन फायटर जेट उभारणार; प्रभाग २४च्या सौंदर्यात पडणार भर


नाशिक :- नितीन चव्हाण ता :, २ सप्टेंबर


 प्रभाग क्रमांक २४ मधील लेखानगर येथील राष्ट्रभक्ती वाहतूक बेट आता भारतीय वायुदलाच्या शौर्याची साक्ष देणार आहे. या वाहतूक बेटावर भारतीय वायुदलाची तब्बल दोन मिग-२१ फायटर जेट विमाने दिमाखात उभारण्यात येणार असून, सध्या त्यांच्या रंगकामासह सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही दोन्ही विमाने नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

भारतीय वायुदलाच्या गौरवशाली इतिहासात मिग-२१ विमानांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. १९६५ व १९७१च्या भारत-पाक युद्धांसह कारगिल युद्ध आणि बालाकोट हवाई कारवाईशी संबंधित भारतीय हवाई सामर्थ्याच्या इतिहासात मिग-२१चे विशेष स्थान आहे. त्यामुळे वाहतूक बेटावर या विमानांची उभारणी म्हणजे शौर्य आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक ठरणार आहे.


याच राष्ट्रभक्ती वाहतूक बेटावर यापूर्वी टी-५५ रणगाडा उभारण्यात आला आहे. आता त्यात दोन मिग-२१ फायटर जेटची भर पडणार असल्याने या परिसराला लष्करी शौर्याची अनोखी झळाळी मिळणार आहे.


शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार होत आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासोबतच नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. रंगकाम व सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मिग-२१चे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments