Type Here to Get Search Results !

प्रभाग २४ मधील धोकादायक डीपींना ‘सुरक्षा कवच’; प्रवीण तिदमे यांच्या पाठपुराव्याला यश

 नगरसेवक प्रवीण ‘बंटी’ तिदमे यांच्या पाठपुराव्याला यश; नागरिकांना दिलासा


नाशिक (प्रतिनिधी) नितीन चव्हाण :ता:, ४ सप्टेंबर


प्रभाग क्रमांक २४ मधील विविध भागांत गेल्या अनेक दिवसांपासून उघड्यावर असलेल्या विद्युत वितरण पेट्या अर्थात डीपींभोवती अखेर संरक्षण जाळी बसविण्यात आली आहे. रहिवासी परिसरात तसेच घरांच्या जवळ असलेल्या या धोकादायक डीपींमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः लहान मुले खेळण्यासाठी बाहेर पडत असल्याने उघड्या डीपींमुळे दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात होती.

प्रभागातील विविध ठिकाणी विद्युत डीपी उघड्या अवस्थेत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. डीपींच्या आजूबाजूला संरक्षण व्यवस्था नसल्याने नागरिकांकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. पावसाळ्याच्या दिवसांत विद्युत उपकरणांजवळ पाणी साचण्याची शक्यता असल्याने धोका आणखी वाढण्याची शक्यता होती.

या गंभीर बाबीची दखल घेत शिवसेना महानगरप्रमुख तथा प्रभाग क्रमांक २४ चे नगरसेवक प्रवीण ‘बंटी’ तिदमे यांनी संबंधित विद्युत विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. डीपींना संरक्षण जाळी बसवून परिसरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी त्यांनी केली होती.

अखेर संबंधित विभागाकडून प्रभागातील विविध ठिकाणी असलेल्या धोकादायक डीपींभोवती संरक्षण जाळी बसविण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे उघड्या डीपींमुळे निर्माण झालेला संभाव्य धोका कमी झाला असून, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


♦️नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य♦️


रहिवासी भागातील विद्युत यंत्रणांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असून, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा वावर असलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उघड्या डीपींना संरक्षण जाळी बसविल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्यातही प्रभागातील धोकादायक विद्युत यंत्रणांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments