Type Here to Get Search Results !

‘व्हिटॅमिन’चा दावा, मात्र फोर्टिफिकेशन लोगो गायब; १.२९ लाखांचा साठा जप्त

रविवार कारंज्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; २९८ किलो पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत


नाशिक नितिन चव्हाण:- 


नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थांची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत रविवार कारंजा परिसरातील मे. विजया एंटरप्रायजेस येथे मंगळवारी (दि. ८) तपासणी करण्यात आली. अन्न पदार्थ मिथ्याछाप तसेच कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून प्रशासनाने एक लाख २९ हजार २९८ रुपये किमतीचा २९८.४ किलो साठा जप्त केला.


कारवाईदरम्यान Inter Estrified Veg Fat (Geer) आणि Inter Estrified Veg Fat (Jay Janki Gold) या दोन पदार्थांचा साठा आढळून आला. संबंधित पदार्थांच्या लेबलवर Nutritional Information मध्ये Added Vitamin A आणि Vitamin D असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, त्यावर Fortification चा लोगो आढळून आला नसल्याचे प्रशासनाच्या तपासणीत स्पष्ट झाले.

या पदार्थांचे नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा नवले व अश्विनी पाटील यांनी सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड आणि सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

Post a Comment

0 Comments