Type Here to Get Search Results !

द्राक्ष व्यापारी हेमंतकुमार सिंग यांच्याकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ६५ लाख रुपये अदा

 द्राक्ष व्यापारी हेमंतकुमार सिंग यांच्याकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ६५ लाख रुपये अदा


दोन वर्षांपासून अडकले होते पैसे; ओझर पोलिसांच्या कामगिरीवर शेतकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, आरोपींना जामीन मंजूर



प्रतिनिधी | ओझर


निफाड व दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल ६५ लाख रुपये थकीत असल्याने ओझर, दिंडोरी व पिंपळगाव पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांची देणी टप्प्याटप्प्याने अदा केल्यानंतर उर्वरित रक्कमही देण्यासाठी व्यापाऱ्याने पुढाकार घेतला. आर्थिक अडचणीमुळे पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी बिहार येथे गेलेल्या व्यापाऱ्याला ओझर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.



पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या पुढाकारातून शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत व्यापाऱ्याने उर्वरित थकबाकी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार अवघ्या २० दिवसांत शेतकऱ्यांचे सुमारे ६५ लाख रुपये अदा करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही काळापासून थकीत पैशांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.




या प्रकरणातील मुख्य व्यापारी हेमंतकुमार सिंग (रा. आरटीओ कॉर्नर, नाशिक) याच्यासह नितीन जंगल रास्कर (रा. पंचवटी नगर, ओझर मिग) आणि कृष्णा रामनाथ निमसे (रा. नांदूर नाका) यांना नाशिक जिल्हा न्यायालयातून जामीन मिळाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. 


पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी, दिंडोरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पिंपळगाव पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी प्रकरणाचा तपास केला. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त केले.


दरम्यान, भविष्यात द्राक्ष व अन्य फळपिकांचा माल व्यापाऱ्यांना देताना शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची विश्वासार्हता, पूर्वीचे व्यवहार, कागदपत्रे तसेच देयकांच्या अटींची योग्य शहानिशा करूनच व्यवहार करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


--------

 ‘थकीत रक्कम मिळाल्याने मोठा दिलासा’ — शेतकरी प्रतिक्रिया

“द्राक्षांचा माल दिल्यानंतर पैशांची मोठी रक्कम थकीत होती. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. पोलिसांच्या पुढाकारामुळे व्यापाऱ्याशी चर्चा झाली आणि २० दिवसांत आमची थकीत रक्कम मिळाली. पैसे मिळाल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांचे आम्ही आभार मानतो.”

— हरीश वाघ, शेतकरी जानोरी


-------


 ‘शेतकऱ्यांचे पैसे देणे ही माझी जबाबदारी’ — व्यापारी प्रतिक्रिया


“आर्थिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांची देणी वेळेत देता आली नाहीत. मात्र, शेतकऱ्यांचा माल आणि त्यांचे पैसे याची मला जाणीव होती. पोलिसांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत उर्वरित रक्कम देण्याचे नियोजन केले. त्यानुसार २० दिवसांत ६५ लाख रुपये अदा केले आहेत. शेतकऱ्यांचे पैसे देणे ही माझी जबाबदारी आहे.”

— हेमंतकुमार सिंग, द्राक्ष व्यापारी

Post a Comment

0 Comments