छत्रपती शिवाजी चौकात राजे छत्रपती मित्र मंडळाच्या गणरायाचे दिमाखात आगमन; कुंभमेळ्याच्या आठवणींसह सामाजिक उपक्रमांची मेजवानी
सिडको (प्रतिनिधी) :-नितीन चव्हाण ता:,१४ सप्टेंबर
ढोल-ताशांचा निनाद, गणरायाच्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि बाप्पाच्या दर्शनासाठी जमलेला भाविकांचा जनसागर... अशा भक्तिमय वातावरणात छत्रपती शिवाजी चौक परिसरातील राजे छत्रपती मित्र मंडळाच्या गणरायाचे दिमाखात आगमन झाले. विधिवत पूजा-अर्चा करून बारा दिवसांसाठी गणरायाची स्थापना करण्यात आली आणि मंडळाच्या २६व्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.
गेल्या २६ वर्षांपासून राजे छत्रपती मित्र मंडळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करत आहे. दरवर्षी भव्य-दिव्य देखाव्याच्या माध्यमातून भाविकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मंडळाने यंदाही गणेशभक्तांसाठी विशेष पर्वणी आणली आहे.
अयोध्येचे राममंदिर ठरणार आकर्षण
‘उत्सव... परंपरेचा, संस्कृतीचा... कुंभमेळा अन् गणेशोत्सवाचा!’ या संकल्पनेतून यंदाचा उत्सव साकारण्यात येत आहे. यंदा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असून, सुमारे ६० फूट लांब, ४० फूट रुंद आणि ५० फूट उंच अशी दोन मजली रचना भाविकांना पाहायला मिळणार आहे.
२७ स्तंभ, तीन भव्य प्रवेशद्वारे, पारंपरिक भारतीय स्थापत्यकलेतील नक्षीकाम आणि कलात्मक कोरीव कामामुळे हा देखावा लक्षवेधी ठरणार आहे. उच्च दर्जाच्या फायबरपासून साकारण्यात येणाऱ्या या प्रतिकृतीसाठी कुरनूल, आंध्र प्रदेश येथील कलाकार मेहनत घेत आहेत.
कुंभमेळ्याच्या आठवणींचा ‘स्मरणपट’
यंदाच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या आठवणींना उजाळा देणारे विशेष प्रदर्शन. कुंभमेळ्यातील जुनी छायाचित्रे, ऐतिहासिक प्रसंग, धार्मिक परंपरा आणि विविध आठवणींच्या माध्यमातून नाशिकच्या कुंभपरंपरेचा समृद्ध वारसा भाविकांसमोर मांडला जाणार आहे.
बाप्पाच्या उत्सवातून सामाजिक संदेश
केवळ देखावा आणि मनोरंजनावर न थांबता मंडळाने सामाजिक बांधिलकीलाही महत्त्व दिले आहे. व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी पथनाट्य आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाचे संस्थापक, शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, गणेशोत्सव २०२६ चे अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
भव्य देखावे, आकर्षक सजावट आणि सामाजिक उपक्रमांसाठी यापूर्वी विविध पुरस्कार मिळविणाऱ्या राजे छत्रपती मित्र मंडळाच्या यंदाच्या गणेशोत्सवाची उत्सुकता नवीन नाशिकसह शहरातील गणेशभक्तांना लागली आहे. भक्ती, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक संदेशाचा अनोखा संगम असलेला हा गणेशोत्सव यंदा नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments