डेंग्यूचा डंख अन् प्रशासनाचा निष्काळजीपणा! ४ वर्षांच्या विपश्यनाचा नाहक बळी
इंदिरानगर प्रतिनिधी :-
स्मार्ट सिटीचा आव आणणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या प्रचंड दुर्लक्षामुळे आणि आरोग्य यंत्रणेच्या चिड आणणाऱ्या निष्काळजीपणामुळे अखेर एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. पाथर्डी फाटा परिसरातील नरहरी नगर येथे राहणाऱ्या विपश्यना मिलिंद बनसोडे या चार वर्षांच्या बालिकेचा डेंग्यू सदृश आजाराने तडफडून मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, 'प्रशासन आणखी किती बळी घेणार?' असा जळजळीत सवाल हादरलेल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कुटुंबीयांनी अश्रूढाल करत दिलेल्या माहितीनुसार, विपश्यनाला ताप आल्यानंतर सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र, प्रकृती खालावत असल्याने तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारात अक्षम्य दिरंगाई करण्यात आली. आजाराची कठीण परिस्थिती आणि गांभीर्य वेळेत न सांगता डॉक्टरांनी वेळ काढूपणा केला, असा थेट आणि गंभीर आरोप चिमुकलीच्या नातेवाईकांनी केला आहे. योग्य आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने या चिमुकलीची प्राणज्योत मालवली. रक्त तपासणी अहवालात डेंग्यूचे स्पष्ट संकेत असतानाही रुग्णालयाने दाखवलेल्या या हलगर्जीपणाची उच्चस्तरीय चौकशी होणार की नेहमीप्रमाणे पांघरूण घातले जाणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एकीकडे शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस खाटा व्यापत असताना, महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र अजूनही गाढ झोपेत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. नरहरी नगर परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत असून उघड्या गटारी, साचलेले घाण पाणी आणि डासांचे थैमान यामुळे हा परिसर आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बनला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने ना कचरा उचलला, नाना (फॉगिंग) करण्याची तसदी घेतली. प्रशासनाच्या याच 'काय फरक पडतो' या नाकर्तेपणामुळे आज एका हसतप्या खेळत असलेल्या बालिकेचा बळी गेला आहे.
एका चिमुकलीचा नाहक बळी गेल्यानंतर नरहरी नगरमधील नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एसी केबिनमधील आराम आणि प्रत्यक्ष जमिनीवरील भयावह वास्तव यातील अंतर आता नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर तरी महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभाग जागे होणार का? दोषी रुग्णालयावर व निष्काळजी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का? की हा मृत्यूही केवळ एका सरकारी आकडेवारीचा भाग बनून राहील? याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल.
चौकट
सभापतींच्याच प्रभागात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर!
विशेष म्हणजे, ज्या प्रभागात ही दुर्दैवी घटना घडली आहे,त्या प्रभागाचे नगरसेवक महापालिकेत सभापती पदावर कार्यरत आहेत. लोकप्रतिनिधी स्वतः एवढ्या महत्त्वाच्या पदावर असतानाही त्यांच्याच प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य साचणे, अस्वच्छता पसरणे आणि नियमित धूरफवारणी न होणे, याबाबत नागरिकांनी तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला आहे. सभापतींच्या स्वतःच्या प्रभागातच जर आरोग्याची अशी हेळसांड होत असेल, तर उर्वरित ठिकाणची काय अवस्था असेल?असा रोखठोक सवाल आता नरहरी नगरमधील नागरिक विचारत आहेत.

Post a Comment
0 Comments