बुडणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांचाही बुडून मृत्यू
पहिने बारी-वाडीवऱ्हे रस्त्यालगतच्या डोहातील घटना; १४ वर्षीय मुलाचा शोध सुरू
सिडको :प्रतिनिधी
पाण्यात पोहत असलेल्या वडिलांना पाहून मुलालाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र, काही वेळातच मुलगा बुडू लागला. लांब अंतरावरून मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच वडिलांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, डोहातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही बुडून मृत्यू झाला. मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
संजय धोंडू सोनवणे (वय ४८, रा. अक्षय चौक, सिडको) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री सोनवणे हा पाण्यात वाहून गेला आहे. गुरुवारी (दि. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास पहिले बारी ते वाडीवऱ्हे रस्त्यालगतच्या डोहात ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री साडेसातच्या सुमारास संजय सोनवणे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. वाडीवऱ्हे पोलिस आणि बचाव पथकाकडून श्री सोनवणे याचा शोध सुरू आहे.

Post a Comment
0 Comments