ज्येष्ठांचा सन्मान हाच संस्कार; प्रभाग ३१ मध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात
नाशिक प्रतिनिधी :नितिन चव्हाण
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ३१ मधील गामणे मैदान येथे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मॉर्निंग ज्येष्ठ नागरिक संघ, दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघ आणि गोल्डन ग्रुप यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीमध्ये ‘ज्येष्ठ आहे घराचा आधार, त्यांचा सन्मान हाच त्यांचा संस्कार’ अशा आशयाचे संदेश असलेले फलक हातात घेऊन ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या माध्यमातून ज्येष्ठांचा आदर, सन्मान आणि त्यांच्या अनुभवाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यात आले.
प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका सौ. वैशाली दळवी आणि बंडूशेठ दळवी यांनीही प्रभात फेरीत सहभागी होत ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहन दिले. यावेळी नगरसेविका वैशाली दळवी यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिक हे कुटुंब आणि समाजासाठी मार्गदर्शक असून त्यांच्या अनुभवाचा आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिक संघांच्या वतीने नगरसेविका सौ. वैशाली दळवी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments